Wednesday 9 December 2015

Lekh

⚡आजच्या दै लोकमत मधील लेख........
सोय ‘व्यवस्थे’ची नव्हे, मुलांचीच पाहिली गेली पाहिजे!
-  डॉ. श्रुती पानसे

कोणत्याही शाळेतला शेवटचा तास
बागकामाचा असेल, नाटक- नाचाच्या सरावाचा असेल तर तो संपूच नये असं वाटतं. शाळा सुटण्याची घंटा वाजली तरी मुलांची पावलं तिथेच रेंगाळत राहतात. पण नेहमीच असतो तसा हा शेवटचा तास अभ्यासाचा असेल तर मात्र शरीराने वर्गात आणि मनाचं लक्ष घडय़ाळाकडे लागलेलं अशा अवस्थेत हा शेवटचा तास जातो. शेवटची काही मिनिटं तर मुलं केवळ कासावीस झालेली असतात, कधी एकदा शाळा सुटते या क्षणाची वाट पाहत असतात. एकदा का तो सुटकेचा क्षण आला, आणि घंटेचा टोला कानी पडला की पाठीवर दप्तर टांगून अक्षरश: घुसाघुशी करत मुलांचा मोठा लोंढा शाळेच्या दरवाज्यातून रेटत बाहेर पडतो. या रेटय़ाला एक मोठ्ठा आवाजही असतो. त्यात आनंदाच्या आरोळ्या असतात. खूप वेळ दाबून ठेवलेले शब्द असतात. मुलांना शाळेबाहेर पडण्याची प्रचंड घाई झालेली असते. बहुतांशी सर्व शाळात हीच परिस्थिती असते. 

शाळेबाहेर पडणा:या मुलांच्या चेह:यावरून, त्यांच्या देहबोलीवरून सुटकेचा आनंद लपत नाही. ही सुटका नक्की कशापासून असते? शाळेच्या वर्गापासून? शिक्षकांपासून? अभ्यासापासून की शिस्तीपासून? की या सगळ्याचाच एकत्रित आनंद झालेला असतो मुलांना? आनंदाचं उधाण आलेली हीच मुलं वर म्हटल्यानुसार काही छान छान कारणं असतील तर मात्र याच वर्गात, याच शिक्षकांबरोबर कितीही वेळ थांबायला तयार असतात. याचा अर्थ त्यांना सुटका हवी असते ती मुख्यत: अभ्यासापासून. तितकंच महत्त्वाचं म्हणजे त्यांना एक प्रकारच्या बंदिस्त रचनेपासूनही सुटका हवी असते.  

शाळांची वेळ 

कुणाच्या सोयीने?

आज शाळांच्या ज्या वेळा आहेत त्या नक्की कोणाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आहेत? आठ तासांची शाळा म्हणजे मुलांवर ओझं असणारच. कारण त्यांना मोकळा वेळ अजिबातच मिळणार नाही.

काही शाळा दोन शिफ्टमध्ये असतात. शाळेच्या या दोन्ही शिफ्ट व्यवस्थित चालाव्यात, यानुसार शाळेच्या वेळा ठरवलेल्या असतात. यात मुलांचा विचार नसतो. शिक्षणशास्त्रत प्रत्येकाच्या जैविक चक्राचा विचार सांगितलेला आहे. प्रत्येकाच्या लर्निंग स्टाईलचाही विचार आहे. मात्र या आपल्या सिस्टीम्स या जैविक गरजांचा विचार करत नाहीत. शाळांच्या या शिफ्ट्समुळे बालवाडीतली मुलं अपुरी झोप डोळ्यांवर घेऊन येतात. रिक्षाकाका अक्षरश: या लहानग्यांना झोपेतून उचलून खाली ठेवतात. मग मुलं डोळे चोळत भानावर येतात. वर्गाकडे चालू लागतात. कित्येकदा मोठी मुलंही काही न खातापिता शाळेत येतात. पोटात काही नसताना शिकणं हे एकूणच चुकीचं आहे. कारण त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती या सगळ्यावरच परिणाम होतो. शाळेत खिचडीचा उपक्रम सुरू करण्याचं हे महत्त्वाचं कारण होतं. कारण भुकेल्या पोटी कोणतीच बौद्धिक गोष्ट घडत नाही. आणि घडलीच तर त्यासाठी खूप जास्त मानसिक शक्ती असावी लागते. तेव्हा शाळेची वेळ ही शाळा व्यवस्थापनासाठी, पालकांसाठी नव्हे, तर मुलांसाठी सोयीची असावी.

कंटाळ्याचा संबंध मेंदूशी!

अनेक ऑफिसेसमध्ये कर्मचा:यांची काळजी घेण्यासाठी, त्यांनी रिलॅक्स व्हावं म्हणून, त्यांच्या मानसशास्त्रचा विचार करून  रिलॅक्सेशन रूम्स असतात. काही ठिकाणी चहा-कॉफी असते. प्रौढांसाठी ही सर्व व्यवस्था असते. पण ज्या शाळेत जाऊन मुलं शिक्षण घेतात, तिथे त्यांच्या रिलॅक्सेशनसाठी आपण काय व्यवस्था करतो?

मुलं शाळेत जाऊन कंटाळत नाहीत, कदाचित अभ्यास करूनही कंटाळत नाहीत. ती कंटाळतात ते एकाजागी दिवसभर बसण्याला. रोज रोज एकाच जागेवर बसायचं. तिथून मित्रंच्या पाठींवरून फळ्याकडे बघत बसायचं, या गोष्टीला ती सर्वाधिक कंटाळतात. शाळा सुटल्यावर त्यांची झालेली सुटका ही बौद्धिक असते, मानसिक असते, तशीच शारीरिक असते. त्यांना चहा, कॉफी वगैरे काहीच नको असते. पाय मोकळे करण्याची मात्र नितांत गरज असते, तेही आपल्यापेक्षा जास्त. 

 याचं कारण मेंदूशिक्षणात नमूद केलेलं आहे. हालचाल ही मेंदूची गरज आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. दोन्ही मेंदूचा समतोल साधण्यासाठी हा भाग सक्षम झाला पाहिजे. त्यासाठी त्याला गरज असते ती हालचालींची. मुलांच्या दृष्टीने त्यांची शारीरिक हालचाल होणं हे फार महत्त्वाचं असतं. ही मेंदूची आग्रहाची मागणी असते. म्हणून मुलं सतत हालचाल करत असतात. चौथीपर्यंतच्या मुलांची तर अवधानकक्षाही (अटेन्शन स्पॅन) कमी असते. जसजशी मुलं मोठी होतात, साधारणपणो आठव्या वर्षाच्या आसपास कॉर्पस कलोझम विकसित होतो. त्यामुळे सततच्या हालचाली करण्याची गरज उरत नाही. यानंतर टप्प्याटप्प्याने एकाजागी जास्त वेळ बसणं शक्य होतं. अशाप्रकारे शारीरिक स्थिरता आली की एकाग्रता वाढते. म्हणून मुलांसाठी खेळ- हालचाल महत्त्वाची! शाळेत एकाजागी मुलं बसतात, ती धाकाने. जर शिक्षक वर्गात नसतील तर मुलं लगेच उधळतात. कारण त्यांना हालचाली करण्याची संधी मिळते. शरीर आणि मनाला जरा सैल वाटतं. खरं सांगायचं तर रिलॅक्स वाटतं. शाळेतली मुलं अनेक तास एका जागेवर बसतात, ते धाकाने. आणि ही गोष्ट एकूण विकासाच्या दृष्टीने काही फार चांगली नाही. 

या मुलांना जास्तीचे दोन तास मिळून अख्खे आठ तास शाळेत डांबणं म्हणजे त्यांच्या विकासाला (खरा अर्थ अभ्यासाला) मदत करणं, हा निष्कर्ष ‘व्यवस्थे’ने मुलांशी न बोलताच काढू नये, एवढं आग्रहाने सुचवावंसं वाटतं.

शेवटी शाळा मुलांसाठी असतात,

मुलं शाळेसाठी नव्हे!

 

अभ्यासाच्या अध्ये-मध्ये

मुलांच्या अंगात प्रचंड ऊर्जा असते. ती ऊर्जा मैदानी खेळ न खेळल्यामुळे, घाम येईपर्यंत भरपूर हालचाल न झाल्यामुळे वापरली जात नाही. सर्वच मुलांना अभ्यासाच्या मध्ये रिलॅक्स वाटणं  आवश्यक आहे. त्या दहा मिनिटांनंतर मुलांची एकाग्रता वाढलेली असेल. त्यासाठी अशा काही गोष्टींचा अवश्य विचार व्हावा.

 

1. केवळ श्रवणावर आधारित अभ्यास असण्यापेक्षा मुलांना बौद्धिक आव्हान मिळेल असा अभ्यास आखावा. 

 

2. अभ्यासाला कंटाळलेली मुलं ‘शैक्षणिक साधनांशी’ खेळायला कायम तयार असतात असं निरीक्षणातून लक्षात आलं आहे.

 

3. क्विझ हा प्रकार मुलांना आवडतो. त्यातून त्यांच्या मेंदूला भरपूर चालना मिळते.

 

4. शेवटचे तास मुलांना खूप कंटाळवाणो होतात हे मान्य करून त्या तासाला मुलांच्या आवडीच्या गोष्टी / आवडीचे तास ठेवणं. 

 

5. मधल्या सुट्टीशिवाय दहा मिनिटं वेगळ्या उपक्र मांसाठी राखून 

ठेवली तर ते मुलांसाठी खरं रिलॅक्सेशन असेल.

 

6. शेवटच्या सत्रतल्या दहा राखीव  मिनिटात मैदानाला एक फेरी, वर्गात दहा मिनिटाचे एरोबिक्स, एखादं गाणं सगळ्यांनी मिळून म्हणणं, झालेल्या अभ्यासावर आपापली मतं सांगण्यासाठी मुलांनी एकापाठोपाठ एक वर्गासमोर येणं असे पर्याय वापरता येतील.

 

No comments:

Post a Comment